पुणे जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा राजीनामा, १६ जुलैला भाजपमध्ये प्रवेश

पुणे: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. पुणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांचा हवाला देत त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी, १६ जुलै रोजी ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ई-मेलद्वारे, तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी (१४ जुलै) सासवड येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करून ते आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा करणार आहेत. १६ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.





