Satara : माथाडी नेते संजय निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागठाणे : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय निकम यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण व कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये २९ हजार माथाडी कामगारांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
कराड उत्तर मतदारसंघातील अपशिंगे (मिलिटरी) गावचे युवा नेते व कामगार नेते संजय निकम, पोपटराव पाटील, आप्पा चिकणे, युवराज घोरपडे, कुंदन शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘संजय निकम यांच्यामुळे भाजपला निश्चितच बळकटी मिळेल. लवकर मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली मोठा कामगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.’ कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आ. मनोज घोरपडे म्हणाले, संजय निकम यांनी विधानसभा निवडणुकीत मला मदत केली असून इथून पुढे पक्ष संघटनावाढीसाठी त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
यावेळी भाजपसह इतर कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यांच्या प्रवेशाबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, खासदार उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.





