Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर सोडली साथ

पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. याचवेळी पक्षांतरालाही वेग आला असून, अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील काही दिग्गज नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे.
या घडामोडींमध्ये आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (शिंदे गट) ला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवाजी सावंत यांनी त्यांची गुप्त भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आज भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली. सूत्रांनुसार, फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीतील काही प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतरामुळे भाजपाची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पक्षांतर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत “घरी सुखी राहा” असा उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी या पक्षांतराला वैयक्तिक निर्णय ठरवत हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मान्य केले आहे.





