Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट लोखंडी सुरक्षा रेलिंगमध्ये घुसली. या भीषण धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला असून अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर बऊर गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगातील कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि एक्स्प्रेस वेवरील लोखंडी सुरक्षा रेलिंगला जोरदार धडकली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर कारमधील प्रवासी आतमध्येच अडकून पडले होते. (Big Accident ) घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीची बचाव पथके आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य करताना कारचा पत्रा कापून तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (Big Accident) मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाला झोप लागली होती का? अतिवेग कारणीभूत ठरला का? किंवा वाहनात तांत्रिक बिघाड होता का? याचा तपास महामार्ग पोलीस करत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन केले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक्स्प्रेस वेवर वेगमर्यादेचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.