बायडेन – ट्रम्प यांचा प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय; अखेरच्या प्राथमिक फेऱ्यांची निवडणूक समाप्त

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रीया म्हणून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रीया मंगळवारी समाप्त झाली. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजय मिळवला आहे. फारच थोड्या राज्यांमध्ये या प्राथमिक फेऱ्यांसाठी मतदान करण्यात आले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक हेराफेरीच्या प्रकरणात दोषी ठरवले गेल्यानंतर त्यांना न्यू मेक्सिकोमध्ये विजय मिळाला. तेथे त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नव्हता. तर मोन्टाना आणि न्यूजर्सी या राज्यांमध्ये ट्रम्प यांची निवड बिनविरोध झाली.
दुसरीकडे बायडेन यांनी न्यू मेक्सिको, साउथ डकोटा, न्यू जर्सी, मोंटाना आणि वॉशिंग्टन डीसी येथे डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक फेरी जिंकली.ट्रम्प आणि बायडेन दोघांनाही मंगळवारच्या सर्व प्राथमिक फेऱ्यांमध्ये सहज विजय मिळण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती.
कारण दोन्ही पक्षांचे शेवटचे प्रमुख उमेदवार म्हणून त्यांचीच नावे शर्यतीत राहिली आहेत. मात्र अजूनही अमेरिकेतील बहुसंख्य मतदारांना बायडेन आणि ट्रम्प यांच्यातच अखेरची लढत व्हावी असे वाटत नाही. २०२० मध्ये या दोघांमध्येच अखेरची लढत झाली होती. त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी अजूनही लोकांना अपेक्षा नाही.





