दुचाकी सर्व्हिसिंग पडली 12 हजारांना
Updated On:

पुणे: पुणे सर्व्हिसिंग करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणाला 12 हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. ही घटना आठवड्यापूर्वी घोरपडीत घडली.
याप्रकरणी आशय भुजबळ (वय 19, रा. घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशय यांना दुचाकी सर्व्हिसिंग करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च करून एकाला फोन केला. त्यानुसार संबंधिताने दुचाकी सर्व्हिसिंग करून देतो असे सांगत, सर्व माहिती ऑनलाइन भरण्यासाठी लिंक पाठविली. लिंकमध्ये माहिती भरल्यानंतर आशय यांच्या बॅंकखात्यातून ऑनलाइनद्वारे 12 हजार रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशय यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील अधिक तपास करीत आहेत.





