पिंपरी | पावसाचा आनंद वाढविणारा भुट्टा बाजारात दाखल

कामशेत, (वार्ताहर) – पावसाळा सुरू झाला की मावळ तालुका पर्यटकांसाठी आनंदवन बनते. हिरवेगार डोंगर, उंचावरुन कोसळणारे धबधबे आणि स्वर्गासमान भासणारे अनेक पाइंट पर्यटकांना आकर्षित करतात.
पावसाळी पर्यटनाच्या आठवणी आयुष्यभर ताज्या राहतात. या दृश्यांसोबत या अतिरम्य वातावरणात गरमा-गरम भुट्ट्याची चव कायमच जिभेवर रेंगाळत राहते, पुन्हा मावळात जाण्याची आतुरता वाढविते. पावसाळी पर्यटन आणि तिखट-मीठ व लिंबू लावलेल्या मक्याच्या कणसे अर्थात भुट्टा हे जणू एक समीकरणच झाले आहे. मावळात पाऊस आणि बाजारात भुट्टा दाखल होऊ लागला आहे.
पावसाळा सुरू झाला की आठवण होते ती मक्याच्या कणासांची. सगळ्यांच्या आवडीचा असणारा भुट्टा बाजारपेठेत दाखल झाला आहे मक्याची कणसे उकडून अथवा भाजून खाण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यात मक्याचे भाजलेले कणीस दिसताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
आल्याचा चहा, भजी यांच्या इतकंच पावसाशी घनिष्ठ नाते असलेला आणि अगदी खावासा वाटणारा ‘भुट्टा’, म्हणजे छान कोळशाच्या शेगडीवर भाजलेले, वरून लिंबू आणि मीठ-मसाला लावून दिलेले मक्याचे कणीस. हा भुट्टा केवळ पावसाचा आनंद घेण्यासाठी म्हणूनच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर समजला जातो.
पावसाच्या गंधमिश्रित ओलसर हवेतही शेगडीवर पुठ्ठ्याने हवा देत भाजला जात असलेला भुट्टा, आपल्या सुगंधाने सगळ्यांना आपल्याकडे खेचून आणतो. मका हा कच्चा किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाता येतो.
लहान मुलांना जेवढा मका आवडतो, तेवढाच तो तरुणांना आणि कुटुंबातील आजी-आजोबांनाही आवडतो. पाऊस पडला की भाजलेल्या भुट्ट्याच्या सुवासाने तोंडाला पाणी सुटते. भुट्टा विक्रीत ना चांगला रोजगार निर्माण होत आहे .
यामुळे तरुणांना रोजगाराची संधी भेटत आहे यामधून चांगली उत्पन्न मिळत आहे त्यामुळे विक्रेते समाधान व्यक्त करत आहे
अनेक गोर-गरीबांच्या रोजगाराचे साधन
पावसाळी पर्यटन हे मावळ तालुक्याच्या अर्थव्यवस्थेतील हे मोठे उत्पन्न स्त्राेत आहे. पावसाळ्यात मावळ तालुक्याच्या विविध ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. आकाशात कोसळणाऱ्या सरींसोबत गरमा-गरम चहा, भजी आणि भुट्टा खाण्यासाठी पर्यटक ठिकठिकाणी थांबतात.
ग्रामीण भागातील अनेकांना हा भुट्टा पावसाळ्यात रोजगार मिळवून देतो. रस्त्याच्या कडेला कुठेही पावसापासून बचाव होइल, असा आडोसा तयार करुन भुट्ट्यासाठी भट्टी पेटवली जाते.
कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पनन हा भुट्टा मिळवून देतो. म्हणून या मक्याच्या कणसाला गोर-गरीबांच्या रोजगाराचे साधनही मानले जाते.





