Bhosari Traffic Update : इंद्रायणी नगर मधील वाहतुकीत मोठे फेरबदल; १० ते २६ फेब्रुवारीपर्यंत ‘हे’ रस्ते राहणार बंद
Bhosari Traffic Update : १० तारखेपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे भोसरीतील अंतर्गत रस्ते वळवले; वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.

Bhosari Traffic Update – पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीच्या अनुषंगाने इंद्रायणी नगर, भोसरी येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. इंद्रायणी नगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे पोलीस भरतीची शारीरिक चाचणी १० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या परिसरात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत.
भोसरी इंद्रायणीनगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कुल गेट नंबर दोन दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी दोन पर्यायी मार्ग आहेत. पहिला म्हणजे भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण मार्गे इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ सीबीएसई स्कूल गेट नंबर दोन येथे उजव्या बाजूने वळून इंद्रायणीनगर पोलीस वसाहत मिनी मार्गत मार्गे जाईल.
दुसरा पर्यायी मार्ग – भोसरी इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण या मार्गे तिरुपती (सहारा) चौकाकडे जाणारी वाहतूक महादेव मंदिर येथून डाव्या बाजूला वळून रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्ट मार्गे जाता येईल.




