Bhosari Bridge : भोसरीतील पूल पाडणार; निगडी – चाकण मेट्रो – विरोधानंतर देखील पूल पाडण्यावर ठाम
Bhosari Bridge : सुधारित डीपीआरनुसार चाकण मेट्रो भोसरीगाव मार्गे जाणार

पिंपरी – निगडी ते चाकण मेट्रोचा नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोकडून सोमवारी (दि. २७) शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला. सुधारित डीपीआरनुसार चाकण मेट्रो भोसरीगाव मार्गे जाणार आणि त्यासाठी महापालिकेचा भोसरीतील उड्डाणपूल पाडला जाणार, हे निश्चित झाले आहे.
तसेच, ऑगस्टमध्ये हा डीपीआर मान्यतेसाठी महापालिका सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचेही या बैठकीत ठरले. हा पूल पाडण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असून त्याचे पडसाद देखील बैठकीत उमटले.
महामेट्रोकडून सुरुवातीला निगडी ते चाकण मेट्रो वल्लभनगर, टेल्कोरोड, स्पाईन रस्ता मार्गे पुढे मोशी असा मार्ग नमूद केला होता. मेट्रो भोसरीमार्गे नेण्याची मागणी जोर धरू लागल्याने महामेट्रोने डीपीआरमध्ये सुधारणा केली. सुधारित आराखड्यानुसार निगडी ते चाकण हा मेट्रो मार्ग एकूण ४५.२ किलोमीटर लांबीचा असणार आहे.
या मार्गावर पूर्वी ३१ मेट्रो स्थानके प्रस्तावित होती. परंतु, बदलानंतर तीन स्थानकांची वाढ झाली असून, ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १२ हजार ३७ कोटी रुपये आहे. हा मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती चौक, ट्रान्सपोर्टनगर, रावेत, पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक, वाकड, भुजबळ चौक, विशालनगर कॉर्नर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वायसीएम, टेल्को रस्ता, लांडेवाडी, भोसरीगाव, पांजरपोळ, मोशी ते चाकण असा असणार आहे.
दरम्यान, भोसरीमार्गे मेट्रोमुळे सद्यस्थिती पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून आणि मेट्रोच्या मार्गावरुन मतमतांतरे होती. यावरुन बैठकीचे वातावरण ही तापले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत डीपीआरचे सादरीकरण केले. पूल पाडून या मार्गे मेट्रो जाईल हे देखील रेटून नेले.
मेट्रो प्रकल्प जलदगतीने राबवावा, शहरात आणखी मेट्रोचे जाळे वाढवावे अशा सूचना उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तसेच, ऑगस्ट महिन्यातील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या डीपीआरला मान्यता देण्याबाबतही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.
‘पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व लोकप्रतिनिधी व महापालिका पदाधिकारी यांच्यासाठी निगडी ते चाकण मेट्रो प्रकल्पाच्या डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. सुरुवातीच्या मार्गात मागणीनुसार काही बदल केले. सुधारित मार्गाप्रमाणे भोसरीतून मेट्रो मार्ग प्रस्तावित केला असून त्यासाठी उड्डाणपूल पाडावा लागेल. हे बैठकीत स्पष्ट केले आहे. लोकप्रतिनिधींच्या इतर सूचनांही बैठकीत जाणून घेण्यात आल्या.’ – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित डीपीआर
एकूण लांबी : ४५.२ किमी
एकूण स्थानके: ३४ (पूर्वी ३१)
अंदाजित खर्च : १२ हजार ९३७ कोटी रुपये
दररोज ३.३२ लाख प्रवाशांची क्षमता
भोसरी डिस्ट्रीक सेंटरच्या जागेत मेट्रोचा डेपो





