मुंबई – टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडी घेतली असून आतापर्यंत या कंपनीने 2.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री यशस्वीरित्या केली असल्याची माहिती टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी दिली. ते म्हणाले की, या क्षेत्रात आम्ही आघाडी कायम ठेवण्यासाठी पुढील पाच वर्षात पाच नव्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारपेठेत सादर केल्या जातील. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात टाटा मोटर्स आपला वाटा 45 ते 50 टक्क्यावर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी 2030 पर्यंत 16 ते 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीने तयारी ठेवली आहे. कंपनीने आतापर्यंत सहा इलेक्ट्रिक कार उपलब्ध केल्या असून पुढील वर्षी सिएरा आणि पंच इलेक्ट्रिक स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. कंपनीने गेल्या दशकात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे सध्या या क्षेत्रात कंपनी इतर कंपन्यापेक्षा पुढे आहे. आगामी काळात आणखी गुंतवणूक वाढवून या क्षेत्रात आपले स्थान अग्रस्थानी ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.