Pune District | भोर, राजगड तालुक्यात महाविकास आघाडीचेच वर्चस्व

भोर, – भोर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी मुळशी तालुका वगळता भोर व राजगड (वेल्हे) तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीसाठी ही धोक्याची घंटा असून यासाठी त्यांना झगडावे लागणार असल्याची स्थिती आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र यावरही बरीचशी राजकीय गणिते अवलंबून राहणार असल्याचे बोलले जात आहे.
भोर विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात शंकर मांडेकर यांना भोर तालुक्यात ३१०७७, वेल्हे तालुक्यात १४३२६ तर मुळशीमध्ये ८१७४९ मते अशी एकूण १२६४५५ मते मिळाली, तर संग्राम थोपटे यांना भोर ५७९५०, वेल्हे २००२२, मुळशी २८३७५ मते असे एकूण १०६८२७ मते मिळाली. कुलदीप कोंडे यांना भोर २४२३६, वेल्हे ३६६८, मुळशी १०४४ मते, अशी एकूण २९०६५ मते, किरण दगडे यांना भोर ११२०२, वेल्हे १२२५, मुळशी १३१३२ मते एकूण २५६०१ मते मिळाली. कोंडे व दगडे यांनी मिळून ५४ हजार ६६६ मते घेतली. सर्वाधिक मतदान भोर वेल्हे तालुक्यात झाले आणि त्याचा मोठा फटका थोपटे यांना बसला. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे यांचा १९६२५ मतांनी पराभव करत विजय मिळवला.
*राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज*
भोर तालुक्यात उत्रौली-कारी गटात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचे उमेदवारी ऐनवेळी छेद देवून शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांना ऐनवेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात घेऊन मोठी राजकीय खेळी करून उमेदवारी दिली. त्यामुळे अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले होते. मात्र तरीही शिवतरे यांनी ११६३१ मते मांडेकर यांना मिळवून दिली. तर थोपटे यांना १९४२४ मताधिक्य मिळाले. थोपटे यांनी या गटात ७९९३ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला सत्तेच्या राजकारणात झगडावे लागणार आहे.
मुळशी तालुक्यात मिळालेल्या ५३३७४ मतांची आघाडी भोर, वेल्हे तालुक्यात महाआघाडी तोडू शकले नाहीत. भोर वेल्हे तालुक्यात थोपटे यांना ७९७९२ तर मांडेकर यांना ४५५०३ मते मिळाली आणि थोपटे यांनी ३४२०० ची आघाडी घेतली. मात्र मुळशी तालुक्यात थोपटेंना झालेले कमी मतदान आणि मांडेकर यांची मुळशीत घेतलेली मोठी आघाडी आणि भोर वेल्हेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने केलेले एकसंघ काम यामुळे आघाडी कमी झाली नाही.
मुळशी तालुक्यात तालुक्यात मोठी आघाडी मिळाली आहे. भोर तालुक्यातील उत्रौली कारी, नसरापूर-भोलावडे, वेळू भोंगावली या तीनही गटांत व वेल्हे तालुक्यात कुरण-विंझर व मार्गासनी-वेल्हे गटात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. यात फक्त वेळू गणात कुलदीप कोंडे यांची आघाडी वगळता महायुतीला कोणत्याही गटात आघाडी मिळालेली नाही. महायुतीच्या दृष्टीने जिल्हा परिषद पंचायत, समितीच्या निवडणुकीत ही धोक्याची घंटा असल्याचे पारावरच्या चर्चांमध्ये बोलले जात आहे.





