Bhor News : पूरग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत द्या ; भोरमध्ये शिवसेनेचे निवेदन

प्रभात वृत्तसेवा
भोर – पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार आर्थिक मदत मिळावी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी व अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झाल्याने त्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी या हेतुने भोर तालुक्यातील शिवसैनिकांनी (ठाकरे गट) एकत्र येत तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना भोर तालुकाप्रमुख दशरथ गोळे, भरत साळुंखे, जिल्हा संघटक माऊली शिंदे, युवा जिल्हाप्रमुख आदित्य बोरगे, तालुका संघटक योगेश गाडे, संतोष पावगे, भोर शहरप्रमुख चंदन कोळसकर, उपतालुकाप्रमुख निलेश मुजुमले, केशव साळेकर, बाळु वाटकर, शरद खाटपे उपस्थित होते.
सततची नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ, महागडी खते, औषधे यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बऱ्याच वेळा पिकांच्या मालाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असून उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बैंक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत.
अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती यासारख्या संकटांना सामोरे जावे लागत असून काही कर्जबाजारी शेतकऱ्यांना वैतागून आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना असल्याचे शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकारी व शिवसैनिकांनी निवेदनात म्हटले आहे.




