प्रभात वृत्तसेवा भोर (दत्तात्रय बांदल) – भोर नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला होणार होती. परंतु अचानक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला. मतमोजणीसाठी आता अवघे ९ दिवस शिल्लक राहिल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांसह नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे. थंडीचा कडाका वाढला असून पोलिसांना मात्र थंडीशी सामना करत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमवर कडक पहारा करावा लागत आहे.मतमोजणीची तारीख लांबल्याने उमेदवारांना मतदान केल्यानंतर तब्बल १९ दिवसाची निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार होती. या १९ दिवसांमधील १० दिवस उमेदवारांनी कशेबशे ढकलले आहेत. तर अजून ९ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल जवळ आल्याने उमेदवारांची प्रतीक्षा शिगेला पोहचली आहे. भोर नगरपालिकेची निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत महायुतीतच अटीतटीची झाली आहे. भोरमध्ये प्रचाराच्या सांगता सभेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हजेरी लावल्याने निकालाकडे भोरचेच नव्हे तर राज्याचे लक्ष भोर नगरपालिकेच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या प्रतिष्ठेसाठी विद्यमान आमदार शंकर मांडेकर भोरमध्ये काही दिवस तळ ठोकून बसले होते तर अस्तित्वासाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही मोठी ताकद पणाला लावली होती.भोरसह राज्यात थंडीचा पारा वाढला आहे. अशा परिस्थितीत मात्र पोलिसांना ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पुढील व मागील बाजूस कडक पहारा करावा लागत आहे. या स्ट्रॉंग रूममध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी अधिकारी वर्गाने कडक शब्दात पोलिसांना आदेश दिल्याने कडाक्याची थंडी असूनही पोलिसांना मात्र डोळ्यात तेल घालून जागता पहारा करावा लागत आहे. थंडगार वातावरणात गरमगरम चर्चा कडाक्याची थंडी पडल्याने भोरमध्ये रात्रीच्या वेळी चौका चौकातून शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. शेकोट्यातून शरीराला उष्ण तापमान घेताना नगरपालिकेच्या निकालाविषयी चर्चेला रंगत येत आहे. पक्षाचे कार्यकर्ते व इतर नागरिक आपापला अंदाज वर्तवण्यात व्यस्त आहेत. तर काही जणांमध्ये अक्षरश: पैजा लगत आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत राजकीय चर्चांमुळे सर्व वातावरण गरमागरम झाले आहे.