भोर: पारवडीत चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले; 33 हजारांचा तांब्याचा ऐवज चोरीला

नसरापूर : भोर तालुक्यातील पारवडी गावात खंडोबा मंदिराजवळ अज्ञात चोरट्यांनी वीज रोहित्र फोडून ३३ हजार रुपयांचा तांब्याचा ऐवज चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी कैलास गोविंद भोये (वय ३३, रा. नसरापूर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १९ जुलै रात्री ८ ते २० जुलै सकाळी १०.३० दरम्यान घडली.
पारवडी ते सांगवी फाटा रस्त्यालगत असलेल्या खंडोबा मंदिराजवळील ६३ के.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्र क्रमांक ४०५८९६६ वर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांनी रोहित्र खाली पाडून त्यातील ऑईल सांडवले आणि अंदाजे ५५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी राजगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय वीज अधिनियम कलम १३६ आणि भादंवि कलम ३२४(४) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २८२/२०२५) दाखल केला आहे. गुन्ह्याची नोंद २१ जुलै रोजी दुपारी १२.३८ वाजता झाली. पोलीस नाईक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.





