Bhor Chain Snatchin : दिवसाढवळ्या वृद्ध महिला टार्गेट! १ तोळ्याची सोन्याची साखळी लांबवून चोरटे फरार
Bhor Chain Snatchin : भोर शहरात भोरेश्वर मंदिराच्या रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ८० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात दुचाकीस्वारांनी बळजबरीने हिसकावली.

Bhor Chain Snatchin – भोर शहरात भोरेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन दुचाकीवरील दोन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नीला जनार्दन मांडके (वय ८०, रा. गणेशपेठ, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीला मांडके या बुधवारी सायंकाळी भोरेश्वर मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरून पायी चालल्या होत्या. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाची सोन्याची साखळी (चेन) जोरात हिसकावून पोबारा केला. या घटनेनंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दोन महिन्यांतील दुसरी घटना
महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबवण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना असल्याने भोरमधील महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. “शहरातील या वारंवार होणाऱ्या चोऱ्या कधी थांबणार?” असा संतप्त प्रश्न भोरकरांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भोर पोलिसांनी चोऱ्यांच्या सत्राला आळा घालण्यासाठी तत्काळ विशेष यंत्रणा राबवावी आणि या भागात गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून केली जात आहे.





