Bhongavali Power Station: भोंगवलीत पॉवर स्टेशनवर हल्ला! ३ कोटींहून अधिकचे नुकसान, कामगारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न?
Bhongavali Power Station: पोलिसांच्या चौकशीला ग्रामस्थांचा विरोध; वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून तणाव निवळण्याचे प्रयत्न.

Bhongavali Power Station – भोंगवली (ता. भोर) येथील ‘हाय व्होल्टेज पॉवर स्टेशन’च्या प्रकल्पावर शुक्रवारी (दि. ३१) रात्री अज्ञात टोळक्याने हल्ला करत जाळपोळ व तोडफोड केली होती. या घटनेत कंपनीच्या ३ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या गुन्ह्याची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी भोंगवली येथील ४ संशयितांना अटक केली आहे.
संतोष शामराव निगडे (वय ५९), निलेश शंकर भांडे (वय ३६), वसंत मालाजी परबळ (वय ४९) आणि शरद भाऊसाहेब ताठे (वय ४५, सर्व रा. भोंगवली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रकल्पाचे सुपरवायझर बिशुमाय शिवानंद घोष (वय ३१, रा. भोंगवली, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सुपरवायझर व इतर कामगार कंटेनरमध्ये झोपलेले असताना ४० ते ५० अनोळखी इसमांनी आवारात बेकायदेशीर प्रवेश केला.
आरोपींनी कंटेनरचा दरवाजा तोडून आत झोपलेल्या कामगारांना जिवाने मारण्याच्या उद्देशाने पेट्रोलने भरलेले फुगे व पिशव्या आत टाकून कंटेनर पेटवून दिला. या दरम्यान हल्लेखोरांनी कंपनीचे ४ जनरेटर, कामगारांची केबिन, २ चारचाकी वाहने, यंत्रसामग्री आणि प्रकल्पाची केबिन पेटवून दिली. तसेच जेसीबी, सिमेंट मिक्सर वाहनांच्या काचा फोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. सध्या राजगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, हल्ल्यात सामील असलेल्या इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांना चौकशीला विरोध; ग्रामस्थ चौकशीसाठी ताब्यात
प्रस्तावित सोलर सबस्टेशन प्रकल्पस्थळी झालेल्या जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना ग्रामस्थ व महिलांनी अटकाव केल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जाळपोळीशी ग्रामस्थांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत नागरिकांनी पोलीस चौकशीला विरोध केला. प्रकल्पस्थळी मशिनरी, वाहने आणि कार्यालयाला आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
तसेच जखमी झालेल्या कामगारांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयाच्या आधारे भोंगवली गावातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली. चौकशीसाठी पोलीस गावात दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी, “आम्ही गुन्हेगार नाही, जाळपोळीच्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही,” अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी काही महिला व ग्रामस्थांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
यानंतर सायंकाळी आणखी काही तरुणांना पोलीस घेऊन जात असताना ग्रामस्थ व महिलांनी रस्त्यावर येत पोलिसांना रोखले. या प्रकारामुळे काही काळ पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केली. दरम्यान, संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी आमदार संग्राम थोपटे, चंद्रकांत बाठे, कुलदीप कोंडे आणि रोहन बाठे यांनी भोंगवली येथे भेट देत ग्रामस्थ व पोलिसांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.





