Bhiwandi News : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या (Bhiwandi News) महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या २२ पैकी ९ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवत स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. या राजकीय भूकंपामुळे भिवंडी महापालिकेत आता काँग्रेसचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ बंडखोर नगरसेवकांनी भिवंडी सेक्युलर फ्रंट नावाने आपला नवीन गट स्थापन केला असून, त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पाठिंब्यामुळे ९० सदस्यीय संख्याबळ असलेल्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बहुमताचा ४६ हा आकडा पार केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, त्यामुळे सत्तेची गणिते कमालीची गुंतागुंतीची झाली होती. काँग्रेस ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपचे २२, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे (शप) १२ नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय समाजवादी पक्षाचे ६, कोणार्क विकास आघाडीचे ४ आणि भिवंडी विकास आघाडीचे ३ सदस्य असून एक अपक्ष निवडून आला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील वाढत्या मतभेदामुळे भाजपमध्ये ही फूट पडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी समाजवादी पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता, मात्र बदलत्या समीकरणांमुळे आता सत्तेचे पारडे काँग्रेसच्या बाजूने झुकले आहे.