Pune gramin : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर धुक्यामध्ये हरवून गेले…

प्रभात वृत्तसेवा
मंचर – पहिल्या श्रावणी शनिवारी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ‘हर हर महादेव’, ‘भीमाशंकर महाराज की जय’, ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मुसळधार पाऊस आणि पडणारे धुके यामुळे मंदिर धुक्यामध्ये हरकून गेले होते. निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी भक्तांनी गर्दी केली असून श्रावण महिन्यातल्या पहिल्याच शनिवारी सुट्टी असल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. परिसरात पाऊस पडत असतानाही भाविकांनी रेनकोट परिधान करत रांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले.
‘हर हर महादेव’, ‘भीमाशंकर महाराज की जय’, ‘जय भोलेनाथ’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर आणि गाभाऱ्यात फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांनी परिसर फुलून गेला होता.हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात भगवान शंकराची उपासना केली जाते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात यात्रा भरते. त्यामुळे देशभरातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात.
मुसळधार पाऊस, दिवसभर धुके, हवेत गारवा यामुळे परिसरात थंडीचे वातावरण तयार झाले. येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून पार्किंगपासून ते एसटी बसस्थानकापर्यत खाजगी व एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासन तयारीत…
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस नियोजन करत आहे.आरोग्य पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. भीमाशंकर मंदिर परिसरात असलेले विविध व्यावसायिक हॉटेल्स स्टॉलचालक यांना स्वच्छता ठेवण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. त्यांचे दर्शन सुलभ होईल.यासाठी देवस्थान ट्रस्ट विशेष प्रयत्न करत असल्याचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले.





