Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिराचे दरवाजे ‘या’ तारखेपासून पुन्हा उघडणार! दर्शनापूर्वी जाणून घ्या प्रशासनाचा नवा नियम
Bhimashankar Temple: कुंभमेळ्यापूर्वी १४८ कोटींच्या पहिल्या आणि २८० कोटींच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; भीमाशंकरवाडी ठरणार पर्यटनाचे नवे आकर्षण.

Bhimashankar Temple – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या मंदिर व परिसर विकास प्रकल्पाचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वास आला असून येत्या 15 जूनपासून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. अवघ्या पाच महिन्यांत मुख्य मंदिर व सभामंडपाचे दगडी बांधकाम पूर्ण करण्यात आले असून पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण विकास आराखडा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे,
अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. शनिवारी (दि. 13) भीमाशंकर येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मंदिर विकास प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 148 कोटी रुपयांची कामे अंतिम टप्प्यात असून दुसर्या टप्प्यातील 280 कोटी रुपयांच्या कामांपैकी सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे.
तसेच भीमाशंकरवाडी हेरिटेज गाव आणि कॉरिडॉरसाठी 172 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मंदिर बंद असताना भाविकांसाठी ऑनलाइन दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. आता मंदिर पुन्हा खुले होत असल्याने सुरुवातीच्या सात दिवसांत दररोज एक हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन भाविकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुविधांसाठी 25 हजार लोकांची क्षमता असलेला दर्शन मार्ग, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, वाहनतळ, भोजनकक्ष, आरोग्य सुविधा आणि पोलीस व्यवस्था उभारण्यात येत आहे. वनक्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर 26 एकर क्षेत्रात मोठे वाहनतळ विकसित केले जात आहे.
तसेच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथून येणार्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विविध रस्ते विकास प्रकल्पांनाही गती देण्यात आली आहे. भीमाशंकरला देशातील आदर्श धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
“भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मंदिर विकासासह पायाभूत सुविधा, वाहनतळ, कॉरिडॉर आणि हेरिटेज गावाची कामे कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”
– जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी, पुणे






