Bhimashankar News : भीमाशंकर-राजगुरुनगर मार्गासाठी कंपन्यांमध्ये ‘टेंडर वॉर’; ‘या’ कंपनीने मारली बाजी
Bhimashankar News : केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन मंत्रालयाचा ७६०.५१ कोटींचा प्रकल्प; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामाला गती.

Bhimashankar News – कुंभमेळा होण्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर–तळेघर–वाडा–राजगुरुनगर या महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरण, पुनर्बांधणी व उन्नतीकरणासाठी केंद्र सरकार रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयामार्फत ७६०.५१ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प ‘दोन लेन प्लस शोल्डर’ स्वरूपात या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून आर्थिक बोली शुक्रवार दि.२७ मार्च रोजी उघडण्यात आली.
एकूण १२ कंपन्यांनी स्पर्धात्मक बोली सादर केल्या. त्यामध्ये शेळके कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि.यांनी ५१३.६५ कोटी रुपयांची सर्वात कमी (एल1) बोली लावून पहिला क्रमांक मिळविला. प्रकल्पाच्या अंदाजित खर्चाच्या तुलनेत ही बोली सुमारे ३२.४६ टक्के कमी आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश अस्फाल्टिंग्स अँड टोल हायवेज इंडिया लि.(५२५ कोटी रुपये) असून तिसऱ्या क्रमांकावर स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा.लि.(५४६.७८ कोटी रुपये) आहेत.
तसेच कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लि., केएनआर कन्स्ट्रक्शन्स लि., कलुवाला कन्स्ट्रक्शन प्रा.लि., भारत कन्स्ट्रक्शन्स (इंडिया) प्रा.लि.आदी कंपन्यांनीही बोली प्रक्रियेत सहभाग घेतला. दरम्यान, काही कंपन्यांच्या निविदा ‘नॉन रिस्पॉन्सिव्ह’ ठरविण्यात आल्या असून त्यामध्ये ड्रीम कन्स्ट्रक्शन, ईगल इन्फ्रा इंडिया लि., ईएमएस लिमिटेड, गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि.आणि श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स लि.यांचा समावेश आहे.
पर्यटनाला चालना मिळेल
या प्रकल्पामुळे भीमाशंकर परिसरासह तळेघर, वाडा व राजगुरुनगर या भागांतील वाहतूक सुलभ होणार आहे. औद्योगिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





