Bhimashankar | दर्शनासाठी गर्दी, पण एसटी गाड्या नाहीत! प्रवाशांची मोठी गैरसोय

प्रभात वत्तसेवा
मंचर – मंचर ते श्री क्षेत्र भिमाशंकर येथे दर्शन आणि पर्यटनांसाठी जाणाऱ्या नागरिकांना एसटी गाड्यांची संख्या कमी असल्याने गैरसोय होत आहे. मंचर,राजगुरुनगर व नारायणगाव एसटी आगाराकडूनही एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भिमाशंकर येथे कोरोना काळानंतर तसेच शासनामार्फत एसटी प्रवाशांसाठी प्रवास भाड्यात सवलत, ज्येष्ठ नागरिक ७५ वर्षांच्या वरील व्यक्तीसाठी मोफत, महिलांसाठी पन्नास टक्के सवलत, अशा विविध कल्याणकारी योजनामुळे भाविक-पर्यटक यांच्या गर्दीने श्री क्षेत्र भीमाशंकर गजबजू लागले आहे.
राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी व येथे निसर्गाच्या विविध कलागुणांनी नटलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एकच गर्दी उसळू लागली आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ व खड्ड्यांचा रस्ता त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण देखील वाढले. त्यामुळे जीवितहानीसह अनेक संकटांचा सामना येथे येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे, प्रशांत काळे, सुरज धराडे, संकेत घोडेकर यांनी तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन दिले.
त्यानंतर रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने भाविक व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत एसटी महामंडळाने एसटी गाड्यांच्या विविध फेऱ्या वाढवण्यासाठी कार्यवाही करावी,अशीही मागणी प्रवाशांनी केली आहे. पुण्या-मुंबईवरुनच एसटी गाड्या प्रवाशांनी भरुन येऊ लागल्याने येथील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी मंचर, नारायणगाव, राजगुरुनगर येथील एसटी आगारामधून एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्यास भाविक भक्तांची सोय होईल.




