भीमा नदीची पाणी पातळी खालावली: वाघोलीची पाणी पुरवठा यंत्रणा होणार विस्कळीत, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

वाघोली – भीमा नदीतील पाणी पातळी खालावली असल्याने वाघोली गावाला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा विस्कळीत होणार आहे. नदीमध्ये पुढील एक ते दोन दिवस पुरेल एवढाच पाणी पुरवठा शिल्लक राहिल्याने वाघोलीत पाणी टंचाई भासणार आहे. नदीत पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाला आमदार ज्ञानेश्वर कटके व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कळविले असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वढू खुर्द येथील बंधाऱ्यावरून वाघोलीला पाणीपुरवठा केला जातो. सध्या भीमा नदीमध्ये पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे जॅकवेलमध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे वाघोलीचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी नदीवरील पाण्याच्या पातळीची पाहणी केली असून महापालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत कळविले आहे. वाघोलीसह लोणीकंद, केसनंद व इतर गावांमध्ये देखील पाण्याची टंचाई भासणार आहे.
“वढू खुर्द येथील बंधाऱ्याचे काम चालू असल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पाऊस कमी पडला आणि तीव्र उन्हाळा असल्यामुळे यंदा सर्वच ठिकाणी पाण्याची पातळी खोल गेली असून पाण्याची टंचाई भासत आहे. वाघोली व परिसरातील गावांची पाणी पुरवठा योजना वढू येथील बंधाऱ्यावर अवलंबून असल्याने चासकमान धरण व जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.गुरुवारी (दि.१०) पाणी धरणातून सोडण्यात येईल तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरावे.” – रामभाऊ दाभाडे (माजी सदस्य, जिल्हा परिषद, पुणे)





