पुण्यातील भिडेवाडा होणार राष्ट्रीय स्मारक; राज्य सरकारचा निर्णय

पुणे – महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाडा स्मारक प्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यावर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. याशिवाय स्मारकासाठी जे पैसे लागतील ते पैसे खर्च केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिले होते.
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री @mieknathshinde जी आणि मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार! #Pune pic.twitter.com/qnVdrichlB
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 23, 2022
भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आढाव यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





