भिडे वाड्याच्या कामाला १५ दिवसांत गती; विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची माहिती

पुणे – महात्मा फुले वाडा, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी बैठक घेऊन १५ दिवसांत अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश अधिवेशनात दिल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच ऊसतोड महिला मजुरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्ताव, पॉक्सो कायद्याचा पुनर्विचार आणि महिला-बालसुरक्षा व्यवस्थापनासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी शहर संघटक आनंद गोयल, उपशहर प्रमुख नितीन पवार उपस्थित होते. अधिवेशनाच्या सुरुवातीला सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार करण्यात आला, असे सांगून त्या म्हणाल्या, अराजक निर्माण करत हिंसाचार माजवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनसुरक्षा विधेयकाद्वारे सशक्त यंत्रणा तयार करण्यात आली आहे. न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पुरावे सादर केल्यानंतरच कारवाई होणार.
हनीट्रॅप संदर्भात काॅंग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर त्या म्हणाल्या, ज्या हनीकडे पुरावे आहेत, त्यांनी ते गृहमंत्र्यांकडे देवून आरोप सिद्ध करावेत. उद्धव व राज ठाकरे एकत्र आले तरी, आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, असे स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
गावातली भांडणं विधिमंडळात
सभापती असताना पडळकरांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यात सुधारणा झाली. मात्र, सभागृहाबाहेर काय होते, त्यावर मी बोलत नाही. अगोदर चिथावणी द्यायची, आणि मग ओरडायचे. गावातली भांडणं विधिमंडळात पोहोचली आहेत, असे मत त्यांनी पडळकर-आव्हाड भांडणावर व्यक्त केले.





