पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! भिडेपूल वाहतुकीसाठी राहणार बंद, काय आहे कारण?

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डेक्कन जिमखाना स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी भिडेपूल बुधवारी (दि. १० सप्टेंबर) पहाटेपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार असल्याची माहिती पुणे मेट्रोने दिली आहे.
गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी भिडेपूल तात्पुरता सुरू ठेवण्यात आला होता. आता पुलावरील पादचारी पूल बांधकामाचे काम पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पादचारी पुलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिक तसेच या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात पोहोचणे सोपे होणार आहे. यापूर्वी छत्रपती संभाजी उद्यान स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून तो प्रवाशांसाठी खुला आहे.
भिडेपूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रोकडून करण्यात आले आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.





