Bhavani Devi | राष्ट्रीय तलवारबाजीचे भवानीदेवीला विजेतेपद

नवी दिल्ली – भारताची महिला तलवारबाजी खेळाडू भवानीदेवी हिने रुद्रपूर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे तिचे 9 वे विजेतेपद ठरले आहे. टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या भवानीदेवीने आपले वर्चस्व या स्पर्धेत सिद्ध केले.
या स्पर्धेत भवानीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारात अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला 15-7 असे पराभूत केले. उपांत्य लढतीत भवानीने के. अनिताचा 15-4 असा सहज पराभव केला. भवानीने पहिल्या गटसाखळी सामन्यात जम्मू-काश्मीरच्या जसप्रीत कौरला 15-2 असे हरवले.
भवानीने त्यानंतर तेलंगणाच्या बेबी रेड्डीचा 15-14 असा पराभव केला. त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात तीने पंजाबच्या जगमीत कौरला 15-7 असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती.
याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले.
केरळच्या अवंती राधिका प्रकाशने महिलांच्या पॉइल वैयक्तिक प्रकारात विजेतेपद राखले. गोव्याच्या चिंगोखाम जेटली सिंगने एपी प्रकारात विजेतेपद मिळवले.





