पुणे जिल्हा | भाटघर धरण ९८ टक्के भरले

भोर, (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील संततधार पावसामुळे भाटघर धरण जलाशयात पाणी वाढत असून धरणात ९८ टक्के पाणी साठा झाल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ मोऱ्र्यांतून काही काळ १ हजार क्युसेकने सोडण्यात आलेला विसर्ग बंद केला असला तरी आज दि.२ रोजी मध्यरात्रीपर्यंत किंवा दि.३ रोजी धरण १०० टक्के भरेल, असा विश्वास पुणे पाटबंधारा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी व्यक्त केला आहे.
भाटघर धरण हे २४ टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे धरण असून चिरेबदी दगडात बाधलेले ब्रिटीश कालीन धरण आहे. याच बरोबर निरादेवघर धरणाचे पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू असून धरण ९४ टक्के भरले आहे. पावसामुळे पाणी वाढत असल्याने आज, दि.२ रोजी सकाळी ९.०० वाजता धरणाचे सांडव्यातून नदी पात्रात २ हजार ६५३ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
तर विद्युत निर्मिती केंद्रातून ७५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याने निरा नदी पात्रात एकूण ३ हजार ४०३ क्युसेक पाणी वाहत असल्याने नदी पात्राचे काठावरील गांवांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. निरादेवघर धरण हे ११.८८ टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे धरण आहे.



