Bhaskar Jadhav : माझ्याच वाट्याला आलं, असं नाही तर अनेकांच्या बाबतीत… ; भास्कर जाधव नाराजीच्या चर्चांवर थेटचं बोलले

Bhaskar Jadhav : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. यामुळे भास्कर जाधव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चा जोर धरू लागल्या होत्या. आता यावर भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव म्हणाले, मी न बोललेल माझ्या तोंडी घातल जातंय. पक्षाने संधी दिली नाही, असे म्हटलं नाही. गेल्या 43 वर्षामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. त्या पुढे जाऊन मी म्हटलो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आले, असे नाही तर अनेकांच्या बाबतीत घडते, म्हणून हे माझे दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला, असं भासकर जाधव म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, गेल्या ४३ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबानं. नाही मिळालं तर, म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता हे सगळं करतोय, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणाकडे तरी जाणार याासाठी वातावरण तयार करतो, माझ्या आयुष्यात असली नौटंकी कधी केली नाही. माझ्या आयुष्यातील किती राजकीय वर्ष राहिली? जे मी त्या काळात केलं नाही, आता कशाला करेल? हे मी पद मिळवण्याकरिता करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले. मी कधी खोटे बोलत नाही. 43 वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटले.




