नवी दिल्ली – सध्या देशातील आणि परदेशातील काही कंपन्या शहरांमध्ये टॅक्सी सेवा खासगी पातळीवर उपलब्ध करीत आहेत. केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकारी तत्त्वावर चालणारी भारत टॅक्स सेवा सुरू करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून गृहपाठ केला होता. आता या सेवाची चाचणी यशस्वी झाली आहे. जानेवारीअखेर दिल्लीसह देशातील विविध शहरात भारत टॅक्सि सेवा सुरू होईल असे सहकार मंत्रालयातील अधिकार्यांनी सांगितले. टॅक्सी सेवाचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म सहकार टॅक्सी को- ऑपरेटिव्ह या सहकारी तत्त्वावर चालणार्या कंपनीने विकसित केला आहे. दोन डिसेंबरपासून राजधानी दिल्लीत या सेवांची चाचणी चालू आहे. ही चाचणी कमालीची यशस्वी झाली असल्याचा दावा या अधिकार्यांनी केला. सहकार मंत्रालयातील अतिरिक्त सचिव पंजक कुमार बंसल यांनी सांगितले की, आम्हाला राजधानीमध्ये नागरिकांनी या सेवेसाठी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. दिल्लीतील प्रायोगिक सेवेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत सध्या या सेवेचा रोज 5 हजार 500 नागरिक लाभ घेत आहेत. विमानतळावरून दिल्ली आणि दिल्लीतून विमानतळावर जाण्यासाठी दीड हजार नागरिक या सेवेचा रोज फायदा घेत आहेत. इतर भागातूनही या सेवेला मागणी वाढली आहे. या सेवेमध्ये कॅबबरोबरच, ऑटो आणि बाईकचा समावेश आहे. दिल्लीतील दीड लाख वाहनधारकांनी आणि चालकांनी या सेवेसाठी नोंदणी केली आहे. सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह या कंपनीची स्थापना देशातील आठ सहकारी कंपन्यांच्या सहभागाने झाली आहे. त्यामध्ये अमूल, इफको, नाफेड, नाबार्ड या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपनीच्या संचालक मंडळावर वाहनधारकांचे दोन प्रतिनिधी काम करीत आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मार्च 2024 मध्ये भारत टॅक्सीची संसदेत घोषणा केली होती. व्यावसायिक कंपन्यावरील अवलंबन कमी करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दिल्लीबरोबर इतर शहरातील चालकही या सेवेला चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले. या सवेला पोलीस विभागही मदत करीत आहे.