Car Safety : कारच्या सेफ्टीत मोठा बदल! 2027 पासून ‘Bharat NCAP 2’, गडकरींची मोठी घोषणा; काय बदलणार?
Car Safety : Bharat NCAP 2 ऑक्टोबर 2027 पासून सुरू करण्याची सरकारची तयारी. कारच्या क्रॅश टेस्टसोबत संपूर्ण सेफ्टी चेनचे मूल्यांकन आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पॉइंट सिस्टम लागू होणार.

Car Safety : भारतातील वाहनांची सुरक्षा अधिक व्यापक करण्यासाठी केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2027 पासून Bharat NCAP 2 सुरू करण्याच्या दिशेने सरकार काम करत आहे. नव्या व्यवस्थेत केवळ कारच्या क्रॅश टेस्टवर भर न देता अपघाताशी संबंधित संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचे मूल्यांकन केले जाणार आहे. (Car Safety)
क्रॅश टेस्टपुरती सुरक्षा मर्यादित राहणार नाही – (Car Safety)
सध्या Bharat NCAP अंतर्गत वाहनांची क्रॅश टेस्ट करून त्यांना 1 ते 5 स्टार रेटिंग दिली जाते. यात प्रामुख्याने प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेचे मूल्यांकन केले जाते. मात्र, Bharat NCAP 2 मध्ये वाहन सुरक्षेचा अधिक व्यापक दृष्टिकोन स्वीकारला जाणार आहे.
गडकरी यांच्या माहितीनुसार, अपघाताशी संबंधित संपूर्ण ‘सेफ्टी चेन’ आणि वेगवेगळ्या सुरक्षा घटकांचे मूल्यांकन केले जाईल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय स्टार्टअप्सनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचाही वापर करण्याची सरकारची योजना आहे.
भारतात दरवर्षी 5 लाखांहून अधिक अपघात – (Car Safety)
भारतामध्ये दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये जवळपास 1.80 लाख लोकांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये 18 ते 36 वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण मोठे असल्याचे गडकरी यांनी सांगितले. अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा प्रवासी वाहन बाजार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्यांच्या मते, भारतात वाहन चाचणीसाठी लागणारा खर्च आणि वेळ आंतरराष्ट्रीय पातळीच्या तुलनेत कमी आहे. ग्लोबल NCAP स्तरावरील वाहन चाचणीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पॉइंट सिस्टम –
वाहनांच्या सुरक्षेसोबतच चालकांच्या वर्तनावरही सरकार लक्ष केंद्रित करत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांसाठी ग्रेडेड पॉइंट सिस्टम आणण्याची तयारी सुरू आहे.
या व्यवस्थेत नियम मोडल्यानंतर चालकाच्या लायसन्समधून गुण कमी केले जातील. वारंवार नियमांचे उल्लंघन करून ठरावीक मर्यादेपर्यंत गुण कमी झाल्यास लायसन्स निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकते.





