Pune : डॉ. चोरडिया यांना भारत भाग्य निर्माता पुरस्कार

पुणे : पर्यावरण विज्ञान आणि जैववैद्यकीय क्षेत्रातील जागतिक संशोधनासह भरीव योगदानासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना भारत भाग्य निर्माता पुरस्कार २०२४ नुकताच प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान राज्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. भारत २४ संस्थेतर्फे या पुरस्कार सोहळ्याचे व भारत भाग्य निर्माता परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले.
भारत २४ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जगदीश चंद्र, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, आचार्य प्रमोद कृष्णम आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, तेलंगणा आणि इतर अनेक राज्यांत हजारो शिक्षक व विद्यार्थ्यांसह जनजागृती फेरी काढली. त्यातून पाणी वाचवा, स्वच्छ भारत, हरित भारत, वीज बचत करा, प्लॅस्टिक पुनर्वापर, कचऱ्यापासून खतनिर्मितीसह इतर पर्यावरणीय उपक्रमांवर भर दिला आहे, असे डॉ. चोरडिया यांनी सांगितले आहे.




