पुणे जिल्हा | खते, बियाण्यांच्या तक्रारींसाठी भोर तालुक्यात भरारी पथके सज्ज

भोर, (प्रतिनिधी) – भोर तालुका कृषि विभागाची खरीप हंगामाची दरवर्षी होणारी बैठक काही मोजके अधिकारी आणि शेतकरी यांचे उपस्थितीत आचारसंहितेमुळे घाईगडबडीत झाल्याने तालुक्यातील शेतकरी बी-बियाणे, खते, ओषधे, किटकनाषके यांच्या नियोजनापासून व माहितीपासून अनभिज्ञ राहिले असून शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
असे असले तरी या वर्षिच्या खरीप हंगामात भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरात पुरवठा व्हावा, तसेच याबाबतच्या तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यासाठी कृषी विभागाकडून तालुका पातळीवर भरारी पथक स्थापन केले असल्याची माहिती पथक प्रमुख तथा तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड व सदस्य सचिव तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.
पाच सदस्यीय भरारी पथकात वजन माप निरीक्षक, मंडळ कृषि अधिकारी भोर-१, भोर-२ व नसरापूर तसेच तालुका कृषि अधिकारी भोर कार्यालयातील कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी खते, बी बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. तसेच खते, बी बियाणे याविषयीच्या असणाऱ्या तक्रारींसाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोर तालुक्यात कृषी सेवा केंद्रे, खते, बी बियाणे औषधे व कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या ४६ इतकी आहे. दुकानदारांना पॉस मशिनद्वारे खते विक्री करण्याची सूचना दिली गेली आहे. पथकामार्फत निकृष्ट दर्जाचे व वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवण्यात येणार असून खत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या, जादा दर मागणाऱ्या तसेच पक्की पावती न देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
विविध तपासण्या करणार
पथकाच्या माध्यमातून दुकानांची तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आदी स्वरूपाची कठोर करवाई करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांनी सांगितले.





