Nagar | भंडारदरा 77 टक्के निळवंडे 36 टक्के

राजूर, (वार्ताहर)- भंडारदरा, मुळा परिसरात पाणलोटात आज दिवसभर पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरले आहे. पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या घाटघरमध्ये 345 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने घाटघर, रतनवाडी, पांजरे व इतर धरण पाणलोटातील गावांमधील भातखाचरे तुडुंब भरल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे भात लागवडीला (आवणी) आता वेग घेतला आहे. आदिवासी शेतकरी बांधवांनी पावसाला सुरुवात झाल्यापासून भात लागवडीच्या तयारीला सुरुवात केली होती.
पावसाला झालेल्या विलंबामुळे आदिवासी बांधवांच्या भात आवण्या रखडल्या होत्या. रतनवाडी व घाटघर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. उडदावणे येथील काळू नदीही दुथडी भरूरुन वाहत असल्यामुळे शिगणवाडी कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
कळसुबाई शिखराच्या पायथ्याशीही पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णावंती नदी मोठया प्रमाणात वाहती झाली असून वाकी येथील लघु प्रकल्प भरून वाहू लागला असून, 1025 क्यूसेसने विसर्ग चालू आहे . जोरदार कोसळणाऱ्या पावसामळे भंडारद-यातील पर्जनमान मोजणाऱ्या सर्व ठिकाणी पावसाने शतकी मजल मारल्याचे दिसून आली.
गत २४ तासात भंडारदरा येथे 180 मिमी पावसाची नोंद झाली. घाटघर 345मिमी, रतनवाडी 326, पांजरे 315मिमी पाऊस पडला. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
धरणाचा सध्याचा पाणीसाठा 8460 दलघफुट असून धरण 75.64 टक्के भरले आहे. निळवंडे 35% पर्यंत भरले आहे. मुळा परिसरात पावसाचे तांडव वाढल्याने भात खाचरे भरले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. मुळा नदी तीस हजार क्युसेसने वाहत असल्याने धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.





