भंडाऱ्यामध्ये भीषण अपघात ! अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूला खेळत असलेल्या अडीच वर्षीय बालकाला आरटीओ कार्यालयाच्या वाहनाने धडक दिल्याने या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना भंडाऱ्याच्या खरबी या ठिकाणी रात्रीच्या सुमारास घडली.
काय घडले नेमके?
पूर्वांश रामकृष्ण वंजारी असं मृतक अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे. तर, दिशांत मुस्तकी मिर्झा (वय ३५) असं आरटीओच्या गाडीवरील वाहन चालकाचं नाव असून तो भंडारा येथील रहिवासी आहे. भंडारा एलसीबीच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली होती.
या ट्रकला जवाहरनगर पोलीस ठाण्यातून खरबी येथील वंजारी यांच्या राईस मिलवर वजन करण्याकरिता नेण्यात येत होतं. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी आरटीओच्या वाहनावरील कंत्राटी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.





