पुण्यातील ‘पीएसआय’ फसवेगिरीतील भामटा

पुणे- ज्येष्ठ नागरिकाला लॉजवर नेऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार नुकताच घडला होता. यातील कथित महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या तीन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. तर, त्यांचा चौथा साथीदार हा चक्क पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक निघाला आहे. इतकेच नव्हे, तर आरोपींनी पुण्यातीलच एका पोलीस निरीक्षकास अशाच प्रकारे ब्लॅकमेल केल्याचे पुढे आले आहे.
या प्रकरणी एका कोथरुड येथील ६४ वर्षीय नागरिकाने दिलेल्या तक्रार दिली होती. दरम्यान, या तीन महिलांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील एका महिलेवर कोल्हापुरात एका डॉक्टरकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. तर, चौथा आरोपी पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ मारुती उभे (५५) हा आहे. पोलिसांचे पथक त्याच्या भुगाव येथील घरी गेले होते. मात्र, त्याने पळ काढल्याची माहिती पुढे आली.
अवंतिका नावाच्या महिलेने ज्येष्ठ नागरिकाशी सलगी करत एका लॉजवर बोलावून घेतले. गप्पा मारल्यानंतर दोन महिला आणि एक पुरुष तेथे आले. त्यांनी मारहाण करत वृद्धाकडे पाच लाखांची खंडणी मागितली. यानंतर ज्येष्ठाला कारमध्ये कोंबून कर्वे पुतळ्याजवळ नेले. तेथे सोन्याची अंगठी विकण्याचा आणि एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या तिन्ही महिला छोटे-मोठी कामे करतात. त्यांचा साथीदार पोलीस उपनिरीक्षक हा पोलीस मुख्यालयातच कार्यरत आहे.
असे फुटले टोळीचे बिंग
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत होते. ज्या लॉजवर हा प्रकार घडला, तेथील रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज बरुरे यांनी तपसाले. त्याचवेळी आरोपी महिलेच्या आधार कार्डची माहिती हाती लागली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी दिसून आली. ही गाडी मुळशीतील एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून आले. त्याची चौकशी केली तेव्हा ती गाडी पोलीस अधिकारी उभे हा वापरत असल्याचे समजले.





