भज्जीचे कार्य पुण्यासाठी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंगने पुण्यात मोबाइल करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करत पुणेकरांसाठी पुढाकार घेतला आहे.
तसे पाहायला गेले तर हरभजन मूळचा पंजाबचा. मात्र, तरीही अनेक क्रिकेट सामन्यांसाठी पुण्यात येऊन खेळलेल्या हरभजनसाठी हे शहर अत्यंत आवडीचे बनले. अनेकदा शहरात त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक खेळाडूंकडे तो नेहमी येतही असतो.
त्याने करोना काळात हा पुढाकार घेतला असून ही प्रयोगशाळा नुकतीच पुण्यात सुरू झाली. हरभजन सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. त्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जकडूनही आयपीएलमध्ये सहभाग घेतला. यंदा तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. मात्र, रोजच्या वृत्तपत्रात करोनाबाबतच्या बातम्या वाचून तो वारंवार बेचैन होत होता. हरभजनकडे एक अत्यंत हळवा क्रिकेटपटू म्हणून पाहिले जाते.
जेव्हा देशात अशाच स्वरूपाच्या नैसर्गिक व विदारक घटना घडत असतात तेव्हाही हरभजन असाच व्यक्त होतो.
भूकंप, त्सुनामी या व असा अनेक घटनांमध्ये तो सातत्याने पुढाकार घेत आला आहे. त्याचे स्वतःचे फाउंडेशन असून त्याच माध्यमातून तो हे समाजकार्य करत असतो. “पुण्यातील करोनाच्या हाहाकाराच्या बातम्या वाचून एक क्षण मन विषण्ण झालो व त्यातूनच अशा प्रयोगशाळेची अभिनव कल्पना पुढे आली’, असे खुद्द हरभजनने सांगितले.
ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल. या मदतीमुळे करोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये दारिद्य्र रेषेखालील लोकांना विनामूल्य चाचणी करता येईल. तर, अन्य व्यक्तींना जवळपास 500 रुपये शुल्क भरून चाचणी करता येईल.
जर हरभजनचा आदर्श समोर ठेवत भारताच्या केवळ क्रिकेटपटूंनीच नव्हे तर सगळ्याच सेलेब्रिटींनी पुढाकार घेत असे कार्य केले तर करोनाची भीतीच संपेलच, शिवाय त्याचे अस्तित्वही नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.





