जामखेड : जामखेड तालुक्यातील सावरगावची कन्या कु. भाग्यश्री उषा जयवंत गोरे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत तालुका कृषी अधिकारी ( Class – 2 ) या पदी निवड झाली आहे भाग्यश्री चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा कर्जत येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर कर्जत व महात्मा गांधी जुनियर कॉलेज येथे झाले तर पदवीचे शिक्षण नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयात (Bsc. Agriculture) पूर्ण केले. ग्रामीण भागातून येत कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. भाग्यश्री चे वडील आरटीओ चे काम करत असून चुलते अशोक गोरे शेतकरी यांनीही, मोठ्या कष्टाने व त्यागाने त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी दिलेले पाठबळ निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या संघर्षाला आणि कुटुंबाच्या योगदानालाही मनःपूर्वक सलाम व अभिनंदन. भाग्यश्री ही एक उत्तम खेळाडू आहे. भाग्यश्री चा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे या निवडीपूर्वी ती गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात ‘कृषी सेवक’ म्हणून कार्यरत होती आदिवासी आणि दुर्गम भागात आपली नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाच तिने जिद्दीने आपला अभ्यास सुरू ठेवला. खेळाडू वृत्ती आणि अफाट कष्टाच्या जोरावर प्रशासकीय सेवेतील हे उच्च पद तिने गाठले आहे या यशाबद्दल भाग्यश्री चे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्या जिद्दीला आणि कष्टाला सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. भाग्यश्री चे हे यश सावरगावसह जामखेड तालुक्यात अभिमानास्पद असून अनेक विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा ठरेल