दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून सावध! सेबी अध्यक्षांचा पोर्टफोलिओ मॅनेजर्सना स्पष्ट इशारा

मुंबई – भारतातील गुंतवणूकदारांची संख्या आणि पोर्टफोलिओ मॅनेजरची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील काम त्रुटीहिन पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे. पोर्टफोलिओ मॅनेजरनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून दिशाभूल करणार्या दाव्यापासून परावृत्त रहावे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपले काम अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना शेअर बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी केली.
असोसिएशन ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजर्स इन इंडिया या संघटनेच्या परिषदेत बोलताना पांडे यांनी सांगितले की, सर्वच पोर्टफोलिओ मॅनेजर दिशाभूल करणारे दावे करत नाहीत. मात्र काही जण अशा अपप्रवृत्तीला बळी पडतात आणि त्यामुळे एकूणच या व्यवसायाबाबत शंकास्पद वातावरण निर्माण होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे या क्षेत्राची विश्वासार्हता वाढेल आणि भारतातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल असे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना पारदर्शक आणि वेगवान सेवा देण्याचा प्रयत्न निरंतर करत राहण्याची गरज आहे. तसे झाले तर भारतीय भांडवल बाजार जागतिक भांडवल बाजाराबरोबर स्पर्धा करू शकेल. त्याचबरोबर भांडवल बाजाराची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल.
पोर्टफोलिओ मॅनेजर्सना चांगले दिवस
पांडे म्हणाले की, सध्या गुंतवणुकीबाबत आणि शेअर बाजाराबाबत पुरेशी माहिती असलेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. शेअर बाजारांचे आणि इतर बाजारांचे कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षम पद्धतीने होत आहे. या क्षेत्रातील नियंत्रण व्यवस्था चांगली आहे. अशा परिस्थितीत पोर्टफोलिओ मॅनेजरना चांगले दिवस आले आहेत असे त्यांनी सांगितले.


