‘बुढ्ढी के बाल’ खाताय सावधान ! आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

अमोल मतकर
संगमनेर – कुठल्याही जत्रेत किंवा बाजारात जा, ‘बुढ्ढी के बाल’ किंवा ‘कॉटन कॅंडी’ दिसली नाही असं होणार नाही. चमकदार रंग आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा साखरेचा पदार्थ पाहून ‘बुढ्ढी के बाल’ कुणाला खावं वाटणार नाही? आणि त्यात लहान मुलं सोबत असतील तर त्यांचा हट्ट तर असतोच.
तेव्हा लहान मुलांसोबत मोठ्यांनाही खाण्याचा मोह आवरत नाही. पण बुढ्ढी के बाल, म्हातारीचे केस किंवा कॉटन कँडी ही खाण्यासाठी सुरक्षित नसल्याचा प्रत्यक्ष अनुभवच संगमनेरातील जागृत नागरिकांनी घेतला असून यामध्ये घातक रंगाचा सर्रास वापर करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल केला आहे.
कॉटन कँडी ज्याला आपण ‘बुढ्ढी के बाल’ म्हणतो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘बुढ्ढी के बाल’ प्रत्येकाने कधीना कधी खाल्लं असेल. लहान मुलं तर आवडीने ते खातात. अनेक ठिकाणी ते सहज मिळून जातं. यात्रा, बाजार, रस्त्यावर अनेक विक्रेते ते विकत असतात. पण, बुढ्ढी के बाल खाणं धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.
संगमनेर शहरातील घास बाजार परिसरात काही जागृत तरुणांनी एका हातगाडीवर ‘बुढ्ढी के बाल’ विकणाऱ्याकडे अनेक लहान मुलांची गर्दी दिसली. तरुणांनी त्याच्याकडे जात विचारणा केली असता तो रंग पंचमीला वापरणारे घातक रंग वापरत असल्याचे दिसून आले. विक्रेत्याला आणखी विचारपूस केली असता नेहमी हाच रंग वापरत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे हे लोक नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्याच्यावर संगमनेर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जे केमिकल कपडे आणि चामड्यांना रंग देण्यासाठी वापरले जाते, तेच यामध्ये टाकलं जात आहे. हेच बुढ्ढी के बाल मुलं आवडीने खातात आणि पालक आपल्या मुलांना घेऊन देतात. बुढ्ढी के बालमधील हे केमिकल एखाद्या विषासारखे असते. यामुळे तुमची मुलं आजारी होऊ शकतात. हे केमिकल शरिरामध्ये गेल्यानंतर किडनी, लीव्हर आणि आतड्यांमध्ये जमा होते. यामुळे कँसर आणि ट्यूमर होण्याचा धोका असतो. आतड्यामध्ये अल्सर होण्याचा धोका देखील वाढतो. याशिवाय डोक्यावर देखील याचा परिणाम होतो. त्वचा आणि डोळ्यात जळजळ होणे असा देखील त्रास जाणवतो.
मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा आई-वडील आपल्या मुलांना बुढ्ढी के बाल घेऊन देतात. पण, आता पालकांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण, बुढ्ढी के बाल खाल्याने कँसर देखील होऊ शकतं. त्यामुळे यापुढे स्वत: खाताना किंवा मुलांना ‘बुढ्ढी के बाल’ घेऊन देताना दहा वेळा विचार करा.





