Video: ‘उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर…’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर

Swami Avimukteshwaranand Saraswati | Uddhav Thackeray : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज (दि. १५) उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ येथे मुंबईत भेट दिली. त्यानंतरत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला.
आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो आणि ‘पुण्य’ आणि ‘पाप’ मानतो. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप मानले जाते, आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हेच घडले आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय त्यांच्या वेदना कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी शंकराचार्य यांचं स्वागत केलं व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजनही केलं.
#WATCH | Mumbai: Shankaracharya of Jyotirmath, Swami Avimukteshwaranand met Shiv Sena UBT leader Uddhav Thackeray at Matoshree.
(Source: Swami Avimukteshwaranand Shankaracharya Media) pic.twitter.com/ucJu2ltCmT
— ANI (@ANI) July 15, 2024
या भेटीनंतर मातोश्री बाहेर पडताच पत्रकारांनी शंकराचार्यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्ही हिंदू धर्म, सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. आपल्या धर्मात पूण्य-पापाची कल्पना मांडली आहे. पापामध्ये घात ही संकल्पना आहे. तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचे बोलले गेले आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे. याचे दुःख अनेक लोकांच्या मनात आहे.
उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर आज मी मातोश्रीवर आलो. आम्हीही त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केल्या. जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही. तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही”, अशी भावना यावेळी मी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कुणाचे हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचे नकली हे जाणून घ्यावे लागेल. जो विश्वासघात करतो, तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो, तो हिंदूच असणार. कारण त्याच्याशी विश्वासघात झाला आहे. ज्या लोकांनी विश्वासघात केला, ते हिंदू असू शकत नाहीत”, असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद यावेळी म्हणाले.
कोण आहे? स्वामी अविमुक्तेश्वरानंद
सप्टेंबर २०२२ मध्ये शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी समाधी घेण्यापूर्वी उत्तराधिकारीची निवड केली होती. त्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिष पीठ बद्रीनाथचे प्रमुख केले होते. १५ ऑगस्ट १९६९ मध्ये प्रतापगडमधील ब्राह्मणपूर गावात त्यांचा जन्म झाला होता.
त्यांचे खरे नाव उमाशंकर पांडे होते. त्यांनी सहावीपर्यंत गावात शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेले. उमाशंकर पांडे यांना त्यांच्या वडिलांनी एका वेळेस गुजरातमध्ये नेले. त्या ठिकाणी काशीचे संत रामचैतन्य यांच्याशी त्यांची भेट झाली.
त्यानंतर त्यांनी उमाशंकर यांना संत रामचैनत्य यांच्याकडेच सोडून दिले. गुजरातमध्ये काही वर्ष अध्यपन केल्यानंतर उमाशंकर वाराणसीत पोहचले. त्या ठिकाणी त्यांची भेट स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी झाली.
त्यानंतर त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात शिक्षण घेतले. २००० मध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांना दीक्षा दिली आणि ते उमाशंकर पांडे ऐवजी स्वामी अविमुक्तेश्वरानंद बनले.





