Ben Stokes Record : बेन स्टोक्सचा मोठा पराक्रम! थेट जॅक कॅलिसच्या पंक्तीत मिळवले स्थान; ठरला इंग्लंडचा पहिलाच खेळाडू
Ben Stokes Record : या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांपेक्षा इंग्लंडचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याच्या गोलंदाजीची सर्वाधिक चर्चा रंगली.

Ben Stokes Record 250 Test Wickets and 7000 Runs : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा पहिला डाव ४३८ धावांवर गुंडाळत मोठा पराक्रम केला. बेन स्टोक्सने २१ षटकांत ७० धावा देत ४ महत्त्वाचे विकेट्स घेतले. या शानदार कामगिरीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपले २५० विकेट्स पूर्ण केले असून एक ऐतिहासिक मैलाचा दगड पार केला आहे.
जॅक कॅलिसनंतर जगातील केवळ दुसराच खेळाडू –
बेन स्टोक्सने या विक्रमासह इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ७००० पेक्षा जास्त धावा आणि २५० हून अधिक विकेट्स घेणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जागतिक क्रिकेटमधील जॅक कॅलिसनंतरचा केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे.
📈 Players with 7000 runs and 250 wickets in Test cricket:
🔘 Jacques Kallis
🔘 Ben StokesAn incredible spell this morning from Ben Stokes to make history at Trent Bridge ❤️ pic.twitter.com/KF7U8exGwj
— England Cricket (@englandcricket) June 26, 2026
सामन्याच्या १०१ व्या षटकात न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला वैयक्तिक ४ धावांवर कॅच आऊट करताच स्टोक्सने हा पराक्रम केला. स्टोक्सने आतापर्यंत १२२ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर ७,२२० हून अधिक धावा आणि २५० विकेट्स आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांत १३,२८९ धावा आणि २९२ विकेट्स घेतले होते.
कसोटीत २५० विकेट्स घेणारा इंग्लंडचा ९ वा गोलंदाज –
या ऐतिहासिक कामगिरीसह बेन स्टोक्स कसोटीत २५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा इंग्लंडचा आतापर्यंतचा फक्त ९ वा गोलंदाज ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामना अत्यंत निर्णायक आहे. मालिकेतील पहिला सामना यजमान इंग्लंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. आता या तिसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





