पुणे जिल्हा | बेलसर फाटा आला नाक दाबुन चला

बेलसर, (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येवून ठेपला आहे. पुरंदरमधील पालखी मार्गा लागत असलेल्या साकुर्डे व बेलसर शिवेवर बेलसर फाटा येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बेलसर फाटा येथे कचरा, मृत जनावरांचे अवशेष, देवदेव आणि पार्ट्यांमुळे दुर्गंधी येत असल्याने बेलसर फाटा आला आता नाक दाबून चला अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
बेलसर फाटा परिसरात असलेल्या हॉटेलचा कचरा, मृत कोंबड्यांचे अवशेष तसेच फाट्यानजीक असलेल्या ओढ्यामध्ये होत असलेल्या देवदेवतांच्या नावाखाली कत्तली याच्या अवशेषामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे.तर चिकन दुकानदार व कोंबड्या वाहतुक करणार्या वाहन धारकांकडून येथे ओढ्याच्या कडेला मेलेल्या कोंबड्या व चिकनचे अवशेष टाकले जात आहे.ते सडून त्यातुन अत्यंत दुर्गंधी पसरत आहे.
रस्त्याने प्रवास करणार्या तसेच बेलसर फाटा ते बेलसर गाव पायी चालत जाणार्या- येणार्या नागरीकांना तसेच विशेष करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास होत आहे. तर या दुर्गंधीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या असल्याचे दिसुन आले आहे.
तर या अवशेषांमुळे पाण्याचा स्रोतही प्रदूषित होणार आहे. बेलसर फाट्यालगत असलेल्या हिंगणे वस्ती व कडा यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोतही प्रदूषित झाले आहेत. तर याच ओढ्याचे पाणी कर्हा नदीला येवून मिळते त्यामुळे कर्हा नदीही प्रदूषित होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून बेलसर फाटा येथे अज्ञात व्यक्तींकडून हा कचरा आणि प्राण्यांचे अवशेष टाकले जात आहेत. देवतांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कत्तली चालू आहेत याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
आम्ही रोज या रस्त्याने चालत बेलसर फाट्यावर जातो; परंतु या दुर्गंधीमुळे आम्हाला उलट्या येतात अत्यंत घाण वास येतो त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. अक्षरशः या रस्त्याने जाऊच नये असे वाटते, असे मत सारिका सुजीत जगताप, आशा जाधव, सायली सुरेश जगताप बेलसर यांनी व्यक्त केले.
भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
प्राण्यांच्या अवशेषामुळे या भागात भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढले आहे.पादचर्यांच्या मनात याबद्दल मोठी भीती निर्माण झाली आहे. कुत्री ही गाड्यांच्या मागे पाळत आहेत तर येणार्या जाणार्यांच्यावरही ही कुत्री भुंकत असल्याने या रस्त्याने चालणे भीतीदायक झाले आहे.
परिसरातील हॉटेल व्यावसायीक, चिकन सेंटर व इतर प्राण्यांचे अवशेष टाकणार्या व्यक्तीना नोटीसद्वारे समज देण्यात येईल. तसेच रस्त्यावर सूचना फलकही लावण्यात येतील. साकुर्डे ग्रामपंचायतीशी संपर्क करून दोन्ही ग्रामपंचायती मिळून यावर कायमस्वरूपी उपाय करत आहोत. – चंद्रकांत हिंगणे, उपसरपंच, बेलसर
बेलसर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या कत्तली, वेस्ट मटेरिअल आणि मृत कोंबड्या टाकल्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. संबंधितांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अन्यथा पसरणार्या रोगराई व त्रासाला प्रशासन जबाबदार असेल. -संतोष जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष, बेलसर





