Ladki Bahin Yojana – लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून तब्बल अडीच हजारांहून अधिक बनावट खाती आढळली आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो सध्या फरार आहे. लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती. आरोपी प्रतीक पटेलने त्याची काही माणसं या कामासाठी नेमली आणि बनावट बँक खाती उघडली. अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत खाते उघडावे लागते. याच गोष्टीची संधी साधत प्रतीक पटेलने त्याची माणसं नेमली. या प्रकरणात अविनाशसह फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आरोपी श्रुती राऊतच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँकांचे पासबुक, बँकांशी संलग्न सिमकार्ड्स पोलिसांना मिळाले. आम्ही १०० हून अधिक खाती संबंधित बँकेला संपर्क साधून बंद केली आहेत. त्याचप्रमाणे १९.४३ लाख रुपयांची रोकड जप्त केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीचा छडा जरी पोलिसांनी लावला असला तरी या प्रकरणातून योजनेच्या पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.