भाजपच्या स्टारकास्ट यादीतून लाडके कवी रामदास आठवले यांचे नाव गायब; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 40 नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. पण या यादीत जीवाभावाचे मित्र आणि लाडके कवींचे नाव न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मित्र पक्षांच्या काही नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आघाडीवर होते. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे नाव पण होते. अर्थात ती लोकसभेसाठीची रणधुमाळी होती.
मात्र आता नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या स्टार प्रचार यादीत रामदास आठवले यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याची नाराजी अगोदरच बोलून दाखवली आहे. विधानसभा निवडणुकीत काही जागांसाठी ते आग्रही होते. पण त्यांच्या पक्षाला जागा वाटपात स्थान देण्यात आले नाही. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात न आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातही झंझावाती प्रचार करणार आहेत. त्यांच्या राज्यभरात ११ ते १२ सभा होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड, धुळे आदी ठिकाणी मोदींच्या सभा होतील, असेही त्यांनी सूचित केले. राज्यातील यावेळची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?
1) देवेंद्र फडणवीस
2) विनोद तावडे
3) चंद्रशेखर बावनकुळे
4) रावसाहेब दानवे
5) अशोक चव्हाण
6) उदयनराजे भोसले
7) नारायण राणे
8) पंकजा मुंडे
9) चंद्रकांत दादा पाटील
10) आशिष शेलार
11) सुधीर मुनगंटीवार
12) राधाकृष्ण विखे पाटील
13) गिरीश महाजन
14) रविंद्र चव्हाण
15) प्रवीण दरेकर
16) अमर साबळे
17) मुरलीधर मोहळ
18) अशोक नेते
19) डॉ. संजय कुटे
20) नवनीत राणा





