पुणे जिल्हा | मोकाट कुत्र्यांमुळे बेल्हेकर त्रस्त

बेल्हे, (वार्ताहर) – बेल्हे (ता.जुन्नर) येथील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहेत. रात्रभर भुंकणे अन् दिवसा वाहनाच्या मागे धावणे, पादचार्यांवर गुरगुरण्यामुळे नागरिक हतबल झाले असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बेल्हे येथे मोकाट कुत्री हा एक गंभीरप्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस या मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांवर हल्ले करण्यापर्यंत मोकाट कुत्र्यांची मजल गेली आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक, दुचाकीस्वार यांना कुत्र्त्यांकडून लक्ष केले जाते.
बर्याचदा घाबरून वाहनधारकांचे अपघात होतात. विशेष म्हणजे ही सर्व कुत्री समूहाने राहतात. या समूहांनी स्वतःच्या हद्दी बनविलेल्या असतात. एकमेकांच्या हद्दीत आलेल्या कुत्र्यांवर ते समूहाने हल्ला करतात. रात्रभर भुंकत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
सुमारे 20 ते 25 कुत्री बाजारपेठेपासून ते मेन आळीपर्यंत वावरत असतात. वाहन, नागरिक किंवा अन्य कुत्रे दिसले की, ते अचानक हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
बेल्हे बाजारातील व्यापार्यांना या कुत्र्यांचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कळपाने फिरणार्या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणेही धोक्याचे झाल्याने प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



