Belhe Bus Stand: बेल्हे बसस्थानक अवैध वाहनांच्या विळख्यात! एसटी बस रस्त्यावरच; अपघाताची भीती
Belhe Bus Stand: रोज २५० ते ३०० बसची ये-जा असलेल्या बेल्हे बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष दीड-दोन वर्षांपासून धूळखात; प्रवाशांना बसच्या वेळांची माहिती मिळेना.

Belhe Bus Stand- कल्याण-अहिल्यानगर या महत्त्वाच्या मार्गावरील बेल्हे बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचा वाढता वावर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने एसटी बसना स्थानकात प्रवेश करणे आणि प्रवाशांची चढ-उतार करणे अवघड झाले आहे.
त्यामुळे अनेक बस रस्त्यावरच थांबवाव्या लागत असून, वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बेल्हे बसस्थानक हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून दररोज सुमारे 250 ते 300 एसटी बसची ये-जा होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहने तसेच इतर वाहनांची गर्दी वाढल्याने एसटी बससाठी जागा अपुरी पडत आहे.
परिणामी बस रस्त्यावर थांबत असून दोन्ही बाजूंनी येणार्या-जाणार्या वाहनांची कोंडी होत आहे. गर्दीच्या वेळेत रस्त्यावर थांबलेल्या बसमुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना-उतरताना तसेच रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी वाहनांची वर्दळ आणि प्रवाशांची गर्दी पाहता गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
बेल्हे बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे कोणती बस किती वाजता येणार, कोणती बस निघून गेली किंवा कोणत्या मार्गावर बस उपलब्ध आहे, याची माहिती प्रवाशांना वेळेवर मिळत नाही. वाहतूक नियंत्रक कक्ष सुरू केल्यास बसच्या येण्या-जाण्याचे नियोजन आणि प्रवाशांना आवश्यक माहिती देणे सुलभ होणार आहे.
“अवैध प्रवासी वाहने हटवून एसटी बसना सुरक्षितपणे स्थानकात ये-जा करता यावी, तसेच बंद असलेला वाहतूक नियंत्रक कक्ष तातडीने सुरू करावा. परिवहन विभागाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. बेल्हे बसस्थानक परिसर प्रवासी आणि एसटी बससाठी सुरक्षित व वाहतूक कोंडीमुक्त करावा.”
– शिवाजी डुंबरे, स्थानिक




