Volvo Bus : एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 200 अत्याधुनिक ‘व्होल्वो’ बसेस; मंत्री सरनाईक यांची घोषणा
महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाने आता खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस (Volvo Bus) दाखल करण्यात येणार आहेत.

Volvo Bus : महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाने आता खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी लवकरच महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस (Volvo Bus) दाखल करण्यात येणार आहेत.
यामध्ये सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रवासी सेवेचा संगम या नव्या सेवेत पाहायला (Volvo Bus) मिळणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच एसटी महामंडळाच्या टप्प्यामध्ये व्होल्वो बसेस समाविष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरनाईक म्हणाले, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या अनेक प्रवासी अधिक भाडे देऊन खासगी आराम बससेवेला पसंती देतात. वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था, कमी प्रवास वेळ आणि रात्रीच्या प्रवासातील सुविधा यामुळे खासगी आराम बससेवेचा स्वतंत्र प्रवासी वर्ग निर्माण झाला आहे.
या प्रवाशांना एसटीकडे (Volvo Bus) आकर्षित करण्यासाठी केवळ पर्याय उपलब्ध करून न देता खासगी आराम बससेवेच्या तोडीची आधुनिक, विश्वासार्ह आणि प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटीने निश्चित केले आहे.
२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नव्या आराम बससेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना डिजिटल पद्धतीने सहज आरक्षण करता येणार आहे.
एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही या बसेसचे (Volvo Bus) तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर येऊन तिकीट काढण्याची आवश्यकता राहणार नाही, असे सरनाईक म्हणाले.






