Newasa : पालकमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर उपोषणाचा प्रयत्न; पोलिसांकडून मारहाणीचा आंदोलकांचा आरोप
Newasa : बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर उपोषणाचा प्रयत्न. लोणी पोलिसांवर आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप; चौकशीची मागणी.

Newasa : बेलापूर-परळी रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर उपोषण करण्यासाठी गेलेल्या रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना लोणी पोलिसांनी ताब्यात घेत मारहाण केल्याचा आरोप आंदोलक रितेश भंडारी यांनी केला आहे.
याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी भंडारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी, यासाठी कुकाणे (ता. नेवासे) येथील रेल्वे कृती समितीच्या वतीने विविध टप्प्यांवर आंदोलने करण्यात आली आहेत. याच मागणीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला.
आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आंदोलकांचा आरोप –
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, बेलापूर-परळी रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात १३ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर जूनमध्ये मंत्रालयासमोरही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांदरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसल्याने आंदोलकांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर उपोषण करण्यासाठी समितीचे पदाधिकारी गेले होते.
पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप –
यावेळी लोणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे चर्चा सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी दमबाजी व अरेरावी करत मारहाण केल्याचा आरोप रितेश भंडारी यांनी केला आहे. तसेच अश्लील भाषा वापरल्याचाही आरोप त्यांनी केला.
आंदोलकांना जबरदस्तीने पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि तेथे मारहाण करण्यात आल्याचे भंडारी यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात लोणी पोलिसांची अधिकृत बाजू किंवा पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.
१५ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन –
या प्रकरणाची पुढील १५ दिवसांत चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलक रितेश भंडारी यांनी दिला आहे.
काय आहे बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न?
बेलापूर-परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, हा मार्ग प्रत्यक्षात साकारावा यासाठी परिसरातील नागरिक आणि रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. केंद्र सरकारकडून या मार्गाबाबत निर्णय व्हावा आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.





