ओडिशातील रेल्वे अपघातानंतर सीबीआयकडून बहनगा स्टेशन सील; देशात पहिल्यांदाच सीबीआय करणार रेल्वे अपघाताचा तपास

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर याठिकाणी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताविषयी मोठी माहिती समोर येत आहे. अपघाताचा तपास सीबीआयद्वारे केला जात आहे. त्यामुळे सीबीआयने बहनगा स्टेशन सील केले असल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयच्या कारवाईनंतर पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही प्रवासी गाडी किंवा मालवाहू गाडी या स्थानकावर थांबणार नाही असे सांगण्यात येत आहे.
बहनगा स्टेशनवरून दररोज सुमारे 170 गाड्या जातात. अपघातानंतर 7 गाड्या थांबल्या होत्या. एका वृत्तसंस्थेने रेल्वे अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रेल्वे अधिकारी चौधरी यांनी याविषयी सांगताना, तपासादरम्यान सीबीआयने स्थानकात उपस्थित असलेली सर्व कागदपत्रे तपासली. लॉग बुक, रिले पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
सीबीआयने आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. मात्र अपघातानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात गाडय़ांची उपस्थिती दर्शवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे आढळले होते. त्यामुळे या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारावर लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना १ लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.





