Pune : वैंकूठात भटक्या कुत्र्यांचा वावर

पुणे : वैकुंठ स्मशानसभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे तोडले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दत्तवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
तर, दुसरीकडे महापालिका अधिकाऱ्यांनी व्हिडीओतील कुत्र्याच्या तोंडात आणि परिसरात पडलेले मांसाचे तुकडे नसून मोठे पाव असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकारावरून महापालिकेचा आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाने एकमेकांकडे बोट केले आहे.
काय घडला प्रकार…
बुधवारी सकाळी काही नागरीक नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी वैक़ूंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी परिसरात काही भटकी कुत्री जळालेल्या मृतदेहाच्या जवळ काहीतरी खात होती. हा प्रकार पाहून घाबरलेल्या नागरिकांनी बारवकर यांना ही माहिती दिली तसेच या कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर बारवकर यांनी या प्रकरणाची आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर हे मृतदेहाचे तुकडे नसून पाव असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.
विभागांचे एकमेकांकडे बोट…
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यविधी होतात. या स्मशानभूमीच्या स्वच्छतेची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे असून इतर व्यवस्थापन आरोग्य विभाग सांभाळते तर विद्युत आणि गॅस दाहिन्यांसह, प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची जबाबदारी विद्युत विभाग सांभाळतो. त्यामुळे प्रत्येक वेळी हे तीनही विभाग एकमेकांकडे बोट दाखवितात. प्रत्यक्षात या ठिकाणी दररोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक कामे ठेकेदारांकडून मनुष्यबळ घेवून केवळ कागदावरच केली जात असल्याने नागरिकांंना मदतीसाठी कोणीही नसते. मात्र, त्याच वेळी देखभाल दुरूस्तीच्या निविदांसाठी मात्र हे तीनही विभाग भांडत असल्याचेही समोर आले आहे.
मी शहराबाहेर आहे. या प्रकाराची मला माहिती नाही. मला बातमी मधूनच हा प्रकार समजला, आरोग्य विभागाकडे स्मशानभूमीचे व्यवस्थापन असले तरी दहनाची संपूर्ण जबाबदारी विद्युत विभागाची आहे. त्यांनाच माहिती असेल काय प्रकार आहे.
– डाॅ. राजेश दिघे, सहायक आरोग्य प्रमुख
आमच्याकडे केवळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि विद्युत दाहिनी चालू बंद करणे एवढीच जबाबदारी आहे. इतर सर्व व्यवस्थापन क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
– मनिषा शेकटकर, विद्युत विभाग प्रमुख




